खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी काय केला संकल्प

0

मुंबई,दि.27: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी सामनात जाहिरात देतो. परंतु यावर्षी आमच्या जाहिराती घेऊ नये असं कर्मचाऱ्यांना वरून कळवण्यात आले होते. त्यामुळे यंदा आम्ही जाहिरात देत होतो परंतु ती सामनातून नाकारण्यात आली. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर, दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. प्रत्येक खासदाराला जाहिरात नाकारण्याचा अनुभव आला असेल अशी माहिती शिंदे गटातील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, महाराष्ट्र सदनात आम्ही हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नव्या संसद भवनात लावण्याचं आणि महाराष्ट्र सदनात बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बनवण्याचा संकल्प आम्ही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी केला. हा संकल्प आम्ही पूर्ण करून दाखवणार आहोत. प्रत्येकाने आपापल्या परिने वाढदिवस साजरा केला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही मोठे झालो आहोत. त्यांचा आदर कायम राहील. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करू. मुंबई तोडण्याचा आयुष्यात कुणीच प्रयत्न करू शकत नाही. तांत्रिकबाबी, कायदेशीरबाबी आहेत. कुठलेही सरकार आणि कोणीही नेता येऊ द्या मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपावर केलं आहे. 

दरम्यान, आम्ही कुठलाही गट स्थापन केला नाही. शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी नेमणूक झाली आहे. मध्यंतरीच्या काळात बाळासाहेबांच्या विचारापासून आम्ही दूर गेलो होतो परंतु आता पुन्हा एकदा सगळे एकदिलाने एकत्र आले आहेत. खासदारांवर उद्धव ठाकरेंचा विश्वास नव्हता. जेव्हा आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी उरलेल्या आमदारांना पत्र पाठवले. परंतु खासदारांना एकही पत्र पाठवलं नव्हतं. अविश्वासाची भावना उद्धव ठाकरेंच्या मनात होती. जोपर्यंत विश्वासाची भावना निर्माण होत नाही तोवर या प्रकरणाची गुंता सुटणार नाही असं खासदारांना वाटत होते. खासदारांबद्दल अविश्वासाची भावना उद्धव ठाकरेंनीच निर्माण केली असा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे.

त्याचसोबत आता बाळासाहेबांच्या विचाराने, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे जे आमदार-खासदार आता त्यांच्याकडे आहेत तेदेखील काही दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र येतील असा विश्वास आहे. 2024 च्या निवडणुकीत लढायचं असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा त्यांना सोडावा लागेल. त्यामुळे आमदार-खासदारांची कसोटी लागणार आहे. आज शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे. भविष्यातही शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. बाळासाहेबांची जी भूमिका आहे तीच आम्ही पुढे घेऊन जातोय असंही राहुल शेवाळेंनी म्हटलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here