मुंबई,दि.९: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची का भेट घेतली याचे कारण सांगितले आहे. आमदार अपात्र प्रकरणावर उद्या (दि.१०) निकाल येणार आहे. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले, लवाद म्हणून दोन वेळा मुख्यमंत्री यांना भेटले आहेत. न्यायमूर्ती आरोपींना जाऊन भेटले मग आम्ही न्यायाची काय अपेक्षा ठेवावी? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
नार्वेकर यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष कोणत्या कारणास्तव भेटू शकतात, अध्यक्षांची कोणकोणती कामे असतात याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी, असं माझं मत आहे. मात्र तरीही ते अशा प्रकारचे आरोप करत असतील तर त्यामागील हेतू काय आहे, हे स्पष्ट होतं. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिका निकालात काढत असतात, त्यावेळी त्यांनी इतर कोणतीही कामे करू नयेत, असा कोणताही आदेश नाही, तरी ते का आरोप करत आहेत, यामागील हेतू स्पष्ट होतो” असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामे असतात, त्यात मुख्यमंत्रीही सदस्य म्हणून असतात. तसंच माझ्या विधानसभा मतदारसंघातील कामे आणि राज्यातील इतर प्रश्नांसदर्भात राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांची मला भेट घ्यायची असेल तर त्यासाठी मला कोणाच्या परवानगी गरज आहे, असं मला वाटत नाही, असा टोलाही नार्वेकरांनी लगावला आहे.
‘आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामं असतात, माझी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक 3 तारखेला नियोजित होती, पण मला इन्फ्लुएन्झाची लागण झाली होती, त्यामुळे मी भेटू शकलो नाही. कुलाबा ब्रीजबाबत चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील आठ रस्त्याचा मुद्दा होता, हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. विधिमंडळातील कंत्राटी कामगारांबाबत ही भेट होती,’ असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं.