मुंबई,दि.11: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी काल (दि.10) निकाल दिला. ठाकरे आणि शिंदे यांचा एकही आमदार अपात्र न ठरवता सगळ्या आमदारांना अपात्रतेपासून नार्वेकरांनी अभय दिलं. राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांच्यावर शिवसेनेचे अधिकृत व्हिप म्हणून शिक्कामोर्तब केलं. झी 24 ला नार्वेकरांनी मुलाखत दिली आहे.
शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड तसेच पक्षातील सर्वाधिकाराच्या निर्णयाची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेली नाही. हे सगळं लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला.
शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून गोगावले पात्र असतील आणि त्यांनी दिलेला व्हीप योग्य असेल तर उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र कसे असू शकतात? असा प्रश्न अनेकांनी विचारला. झी 24 च्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट या विशेष कार्यक्रमात विधानसभा अध्यक्षांनी याचा खुलासा केला आहे.
अपात्रतेचा निर्णय घेताना 3 फिल्टर समोर होते. व्हीप इश्यू करणाऱ्याकडे ते अधिकार होते का?, तो व्हीप इश्यू झाला होता का? आणि व्हीप इश्यू झाला तो योग्यरित्या बजावला होता का? संबंधितावर त्याची कारवाई झाली का? यावर विचार झाला.
भरत गोगावलेंना व्हीप बजावल्यावर त्यांनी योग्यरित्या कारवाई केली नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही, असा खुलासा नार्वेकरांनी केला. तसेच हीच ठाकरे गटाची मागणी होती, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला व्हीप मिळाला नाही, असे ठाकरे गटाचे आमदार वारंवार सांगत होते, याची आठवण त्यांनी करुन दिली.
कोणालाही अपात्र न करता सिम्पथी मिळवण्याचा प्रयत्न नव्हता. केवळ कायद्याचा विचार केला आहे. संसदीय लोकशाही अधिक बळकट कशी होईल? हे पाहून हा निर्णय दिल्याचे राहूल नार्वेकर यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंचे आणि माझे चांगले संबंध आजही…
हा विषय खूप संवदेनशील होता आणि जबाबदारीही मोठी होती. ती जबाबदारी प्रामाणिकपणे मी पार पाडली आहे. याची जाणिव मला असल्याचे नार्वेकर म्हणाले. मी न्याय देताना मी न्यायाधिशाच्या भूमिकेत असतो. आदित्य ठाकरेंचे आणि माझे चांगले संबंध आजही आहेत. पण जे काम मी पार पाडत असताना मैत्रीला कुठेही जागा नसल्याचे नार्वेकर यावेळी म्हणाले.