राष्ट्रवादीला शिवसेना निकालाचे निकष लागू होणार? राहुल नार्वेकर म्हणाले…

0

मुंबई,दि.12: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निकाल दिला. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असा निकाल नार्वेकर यांनी दिला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्याचा अधिकार नाही. हा अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे असा निकाल दिला. ठाकरे गट व शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आले.

ठाकरे गटाने केलेली आमदार अपात्रेची मागणी फेटाळली. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हावर दावा सांगितला आहे. यावरही विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय देणार आहेत. त्यामुळे शिवसेना निकालाचे निकष राष्ट्रवादीच्या प्रकरणासाठी लागू असणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘टीव्ही 9 मराठी’च्या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांनी यावर भूमिका मांडली. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. राहुल नार्वेकर यांच्या या निकालाची राज्यभरात जोरदार चर्चा आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

“तो मुद्दा ठरवणं आवश्यक आहे की नाही बघावं लागेल. मला वाटतं निवडणूक आयोगाकडचा निर्णय वादाच्या आधी झाला नव्हता. राष्ट्रवादीचे फॅक्ट वेगळे आहेत, ते बघावे लागतील. मी काही बघितले नाही. पण निकष काही बदलणार नाहीत. कायदा काही बदलणार नाही. पण फॅक्ट्स हे केस टू केस वेगळे असू शकतात. त्या बेसिसवर नियम लागू करावा लागेल”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

तुमच्यावर काही दबाव होता का? या निकालाचा दाखला दिला जाईल म्हणून? असा प्रश्न नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “प्रथा, परंपरा आणि पायंड्यातून कायदे बनतात आणि विधीमंडळातही बनतात. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर तो सर्वत्र लागू होतो. त्यामुळे हा निर्णय गाइडिंग फोर्स आणि बायडिंग फोर्स म्हणून काम करेल. चॅलेंज झाला नाही तर प्रेसिंडेंट बनेल. चॅलेंज झाला आणि तो अपहोल्ड झाला तर तो प्रेसिडेंट म्हणून कॅरिफॉरवर्ड होईल आणि ओव्हरुल झाला तर कोर्टाचा जो निर्णय असेल तो देशाचा लॉ होईल”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणीदेखील शिवसेनेसारखीच पार पडणार आहे. या सुनावणीतही दोन्ही गटाचा युक्तिवाद आणि उलटसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. पण राष्ट्रवादीच्या केसमध्ये चित्र काहीसं वेगळं आहे. राष्ट्रवादीचा वादावर निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: निवडणूक आयोगाच्या सुनावणीला उपस्थित राहायचे. तसेच ते राहुल नार्वेकरांच्या सुनावणीलादेखील उपस्थित राहू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here