Rahul Narwekar On Maharashtra Crisis: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल मोठं विधान

0

मुंबई,दि.१५: Rahul Narwekar On Maharashtra Crisis: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नार्वेकरांनी अपात्रतेच्या निर्णयाबद्दल मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर? | Rahul Narwekar On Maharashtra Crisis

यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले, “१६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ज्याकाही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम राजकीय पार्टी कुणाची आहे? याचा निर्णय होणं आवश्यक आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य निर्णय घेऊ…”

विधानसभा अध्यक्षांनी १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागणीबाबत विचारलं असता राहुल नार्वेकर म्हणाले, “मागण्या सर्वजण करत असतात. पण कायद्यानुसार काही तरतूदी आहेत, इतरही काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. आपल्याला निर्णय घेण्यासाठी घाई करायची नाही आणि विलंबही करायचा नाही. जो निर्णय होईल, तो निर्णय संविधानातील तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेतला जाईल.”

“सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यांवर मी टिप्पणी करत नाही. मला तशी टिप्पणी करायची गरजही नाही. त्यामुळे कुणी १५ दिवस, कुणी २० दिवस तर काहींनी दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पण मी याकडे लक्ष देत नाही. मी कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेणार. कुणाच्या मनासारखं व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल. कुणाचा आरोपांना घाबरून मी निर्णय घेत नाही,” अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here