Rahul Gandhi PC खासदारकी रद्द करून मला तुम्ही गप्प बसवू शकत नाही: राहुल गांधी

0

नवी दिल्ली,दि.25: Rahul Gandhi PC: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. खासदारकी रद्द करून मला तुम्ही गप्प बसवू शकत नाही असा इशाराही या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला दिला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काल राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. दरम्यान, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पाहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच अदाणी आणि मोदींच्या संबंधावर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे | Rahul Gandhi PC

देशात लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. खासदारकी रद्द करून मला तुम्ही गप्प बसवू शकत नाही असा इशाराही या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माझं नाव सावरकर नाही त्यामुळे मी कधीच माफी मागणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुढची भूमिका काय असेल?

खासदारकी रद्द झाली आहे, आता आपली पुढची भूमिका काय असेल? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, पुर्वी विरोधी पक्षांना देखील प्रसार माध्यमं आणि इतर संस्था सहकार्य करत होत्या. मात्र आता तसं होत नाही, त्यामुळे विरोधी पक्षांना लोकांशी थेट संवाद साधावा लागणार आहे. आम्ही भारतजोडो यात्रेच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला.

भाजपकडून सातत्यानं राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान झाला असा आरोप करण्यात येत आहे. याला देखील राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. मी जेव्हा भारत जोडो यात्रेत सहभागी झालो तेव्हाच सांगितलं होतं सर्व समाज एक आहे. मग ओबीसीचा अपमान मी कसा करू शकतो? देशातील महत्त्वाच्या मुद्दयावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून असा प्रचार सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी म्हणाले… | Rahul Gandhi

देशात आज लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची उदाहरणं रोज बघायला मिळतात. मी संसंदेत मोदी आणि अदाणींच्या संबंधावर प्रश्न विचारले होते. त्याचे पुरावेदेखील सादर केले होते. अदाणींच्या कंपनींमध्ये २० हजार कोटी कोणी गुंतवले? असा थेट प्रश्न मी विचारला होता, त्यामुळे माझी खासदारकी रद्द करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच माझी खासदारकी रद्द झाली, तरी मी गप्प बसणार नाही. मी मोदी सरकारला प्रश्न विचारणं बंद करणार नाही. मी त्यांना घाबरत नाही. असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना, देशाच्या लोकशाहीचं, देशातील संस्थांचं रक्षण करणे, देशातील गरीब लोकांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवणं आणि पंतप्रधानांशी असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेणाऱ्या अदाणींसारख्या लोकांबद्दल सत्य बोलणं हे माझे काम आहे. मी मोदी सरकारच्या धमक्यांना आणि आरोपांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here