Rahul Gandhi On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवालाही सांगू शकतात की ब्रह्मांडात काय चाललं आहे: राहुल गांधी

0

मुंबई,दि.३१: Rahul Gandhi On PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. राहुल गांधी हे मंगळवारी अमेरिकेला पोहचले आहेत. राहुल गांधी सहा दिवस अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. आपल्या छोट्याश्या भाषणात त्यांनी भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रह्मांडात काय चाललं आहे हे देवालाही समजवू शकतात असं म्हणत त्यांनी हा टोला लगावला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी? | Rahul Gandhi On PM Modi

“भारतात काही लोक असं आहेत ज्यांना वाटतं की आम्ही सर्वज्ञानी आहोत. त्यापैकी एक नरेंद्र मोदी आहेत. त्यांना वाटतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीतली सगळी माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवालाही सांगू शकतात की ब्रह्मांडात काय चाललं आहे? ते वैज्ञानिकांना विज्ञानाविषयी आणि इतिहासकारांना इतिहासाविषयी समजवू शकतात. युद्ध कसं करायचं ते लष्कराला शिकवू शकतात. आकाशात विमानांनी भरारी कशी घ्यायची ते वायुदलाला समजावू शकतात. अगदी काहीही कुणालाही समजावू शकतात. पण मुळात असं आहे की त्यांना काहीही माहित नाही. कारण आयुष्यात तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर तुम्हाला आधी ऐकून घ्यावं लागतं. मी भारत जोडो यात्रेत हेच शिकलो आहे की प्रत्येकाकडून काहीतरी शिकलो आहे” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

आम्ही जेव्हा भारत जोडो यात्रा सुरु केली होती तेव्हा पाच ते सहा दिवसांमध्ये आम्हाला हे कळलं होतं की हजारो किमीची ही यात्रा करणं सोपं काम नाही. कॉलेजच्या दिवसांमध्ये मला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. मात्र आम्ही रोज २५ किमी चालत होतो. तीन आठवडे जेव्हा संपले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्हाला थकवा जाणवत नाही. कारण आमच्या मनात ही भावना होती की संपूर्ण भारत आमच्याबरोबर चालतो आहे. लोकांचं प्रेम मिळतं तेव्हा थकवा निघून जातो. भारत जोडो यात्रेत आम्ही प्रेम, आपुलकी आणि मैत्री हेच पसरवण्याचं काम केलं असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

आमची भारत जोडो यात्रा रोखण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न करण्यात आले. पोलीस आणि सरकारी यंत्रणांचा पुरेपूर वापर करण्यात आला. मात्र सरकारचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले. कुणीही आमच्या विरोधात काहीही करु शकलं नाही. भाजपा आणि आरएसएस हे जनसभा, लोकांशी चर्चा, रॅली या सगळ्यांवर नियंत्रण आणू पाहात आहेत. लोकांना धमकावलं जातं आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here