पुणे,दि.6: PM Modi, Ajit Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांवर भाष्य केले. आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पुण्याच्या विकासात महत्त्वाच्या योगदान असणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन करण्याची संधी आज मिळाली. पुणे मेट्रोचे भूमिपूजनासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले यासाठी पुणेकरांचा आभारी आहे. याआधी भूमिपूजन होत असे पण प्रकल्प कधी पूर्ण व्हायचे हे कळायचे नाही. पण, आता भूमिपूजन केले जाऊ शकते आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. समाजातील सर्वच घटकांनी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला
मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्षात आणून द्यायचे आहे, की गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. मोठ्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.
शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्याने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे पुण्यातील जनतेच्या राज्याच्या वतीने स्वागत केले. ही भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी सहकार्य केले त्यासाठी तुमचे आभार मानतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले. पुणेकरांच्या सहनशिलतेला दाद द्यावी लागेल. कारण बारा वर्षांपुर्वी या मेट्रोला परवानगी मिळाली होती, पण काही कारणांनी काम सुरु झाले नाही. काही लोकप्रतिनिधींकडून मेट्रो इलेव्हेटेड करायची की अंडरग्राऊंड करायची यासाठी वेळ लावण्यात आला. त्यामुळे मेट्रोचे काम सुरु होण्यास अवधी लागल्याचे अजित पवार म्हणाले.