मुंबई,दि.10: महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे. दोन्ही पक्षाच्या फूटलेल्या गटाने पक्षावर दावा सांगितला आहे. शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर राज्यात सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा करणाऱे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर काँग्रेसमध्येही फोडाफोडी करत असल्याचा आरोप केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तो दावा खरा ठरला होता. आता भाजपा काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं महाराष्ट्रात दोन राजकीय भूकंप झाले. पण आता भाजपाने काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप, पृथ्वीराज चव्हाणांनी केला.
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. एवढंच नाही, तर चव्हाणांना त्यांच्याच नेत्यांवरच विश्वास नाही का? असा पलटवार गिरीश महाजनांनी केलाय. ‘तुमचा तुमच्याच लोकांवर विश्वास नाही का? का तुमचा स्वत:वरच विश्वास नाही? तुम्ही सगळे दिग्गज नेते आहात, तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळलं पाहिजे ना, तुमच्यातले किती तरी माजी मुख्यमंत्री राहिले आहेत,’ असं गिरीश महाजन म्हणाले.
राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून काँग्रेसही फुटणार असल्याची चर्चा होती. आता चव्हाण यांनी भाजपा तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.