पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार

0

मुंबई,दि.28: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत 29 व 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे  प्रचारसभा होणार आहेत. 

बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दोन दिवसांतील सभांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे, कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा दुपारी 3:45 वाजता, पुणे येथील सभा संध्याकाळी 5:45 वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होणार आहे. ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे.

30 एप्रिल मंगळवारी दुपारी 11:45 ला माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे दुपारी दीड वाजता तर धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी तर दुपारी 3 वाजता, लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होणार आहे, असे बावनकुळे यांनी पत्रकात म्हटले आहे. 

भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सभांची जय्यत तयारी चालू आहे. या सभांच्या आयोजनाची जबाबदारी पुढील नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. सोलापूर-आमदार सचिन कल्याणशेट्टी, नरेंद्र काळे, कराड-धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, पुणे-राजेश पांडे, जयंत येरवडेकर, धीरज घाटे, माळशिरस-आमदार जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, धाराशिव-आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, लातूर-आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, अरविंद निलंगेकर, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here