मुंबई,दि.15: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरत यांच्यासह महाविकास आघाडीत मोठे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
काय म्हणाले शरद पवार?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात पंतप्रधानांच्या 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा जिथे झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
पंतप्रधान जेवढ्या जास्त ठिकाणी भेटीला
आता विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान जेवढ्या जास्त ठिकाणी भेटीला येतील, तेवढं आम्हाला स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी अनुकूल वातावरण होईल. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतो, अशी कोपरखळीही शरद पवार यांनी लगावली.
यावेळी शरद पवार यांनी राज्यातील विविध विषयावर भाष्य केले. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने आपली किंमत कमी करुन घेतली या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांना नेमकं एवढंच सांगायचे आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणे अनेक आहेत. पण ते अजूनही बोलू इच्छित नाहीत. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही कशाला काय सांगू,” अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.