Pravin Togadia: प्रवीण तोगडिया यांनी भोंग्यावरून भाजपाला विचारला प्रश्न

0

मुंबई,दि.१९: प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांनी भोंग्यावरून भाजपाला (BJP) प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायला हवे असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंगे काढण्यात यावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने हालचाली करत भोंगा लावण्या संदर्भात नियमावली जाहीर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भोंगे हटवण्याची मागणी करत मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर पोलीस प्रशासनाला भोंगे हटवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. तसंच भाजपच्या विविध नेत्यांकडूनही या मागणीचं जोरदार समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांनी मात्र भाजप नेत्यांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारत टीका केली आहे.

‘महाराष्ट्रात तुमचं सरकार असताना तर तुम्ही भोंगे हटवले नाहीत. मात्र आता राज्यात दुसऱ्या कोणाचं तरी सरकार आल्यानंतर तुम्ही भोंगे हटवण्याची मागणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे,’ असा टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला आहे. तसंच हे भोंगे उतरवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनंती भाजप नेत्यांनी केंद्र सरकारकडे करावी म्हणजे हा प्रश्न कायमचा संपून जाईल, असंही तोगडिया यांनी म्हटलं आहे.

प्रवीण तोगडिया

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रवीण तोगडिया यांनी अनेक वर्ष काम पाहिलं आहे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचा संघटनेतील इतर नेत्यांशी वाद झाला आणि तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली. त्यानंतर तोगडिया यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. अशातच आता पुन्हा भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here