मुंबई,दि.१७: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सीमावादावर मोठं विधान केलं आहे. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. ‘राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची तुलना केल्यामुळे जनतेत रोष आहे. तर दुसरीकडे निर्माण झालेला सीमाप्रश्न हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कॅरेक्टर दाखवणारा आहे. कारण महाराष्ट्रातील सीमेवरील अविकसित गावांनी कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.’
काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार
‘याला सर्वस्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच पक्ष जबाबदार आहेत,’ असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या पक्षांसोबत आंदोलनात सहभागी झाल्याने या सगळ्या प्रकरणाचे शिंतोडे शिवसेनेवरही उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या दोन पक्षांशी राजकीय तडजोड करावी, मात्र त्यांच्यासोबत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होताना विचार करावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
शिवसेना ताकत दाखवेल
या मोर्चातून शिवसेना आपली ताकत दाखवेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ताकदीवरच रस्त्यावर उतरा, असं मी भेटीत उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं. मात्र आम्ही सत्तेत एकत्र होतो, त्यामुळे या आंदोलनात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सामावून घ्यावं लागेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून एकजुटीने मोर्चेबांधणी सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंबेडकर यांच्या या टीकेला आघाडीकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.