छत्रपती संभाजीनगर,दि.17: Prakash Ambedkar Visited Tomb Of Aurangzeb: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आज खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. सध्या औरंगाबादचे नामांतर, औरंगजेबाचे पोस्टर, स्टेटस ठेवल्यावरून राज्यभर वाद विवाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी येथे भेट दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात औरंगजेबावरून वाद पेटत आहेत. स्टेट्स, पोस्टरवरून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जावे, अशी मागणी केली होती. तर केंद्र सरकारने आधी या स्मारकाचा विशेष दर्जा काढून घ्यावा, असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाने दिलं होतं.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे त्यांच्या या कृतीवरुन आता वेगवेगळ्या चर्चा निर्माण होऊ शकतात.
प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी सोबत राजकीय समझोता करण्याची तयारी दर्शविलेली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट देखील यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
औरंगजेबाचे राज्य जयचंद यांच्यामुळे आले | Prakash Ambedkar Visited Tomb Of Aurangzeb
खुलताबाद ऐतिहासिक शहर आहे, आम्ही येथील मारुती मंदिराला देखील भेटत आहोत. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरु आहे त्यांना एकच सांगतो, औरंगजेबाने राज्य केले हे कोणाला मिटवता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले, औरंगजेबाचे राज्य जयचंद यांच्यामुळे आले. असे जयचंद येथील अनेक हिंदू राज्यांकडे होते. त्यांना तुम्ही का विरोध करत नाहीत. ज्यांनी देशाला गुलाम केले त्यांची तुम्ही निंदा करा. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या मजारीला भेटीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीला वाकून फुले वाहताना दिसत आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर चादर देखील चढवली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय मैत्री केली आहे. ठाकरे गटाची याबाबत असलेली भूमिका सर्वश्रूत आहे.