सोलापूर,दि.२७: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा आज पंढरीत दाखल झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित सभेमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. परंतु या दोघांचीही मिलीभगत असून यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे केली.
सध्या मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर जोरदार टीका करीत आहेत. परंतु हे नकली भांडण असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. फडणवीस हे जरांगे यांच्या मागणीला विरोध करीत नाहीत. तर ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार असूनही हा पक्ष ओबीसीच्या बाजूने भूमिका घेत नाही. तरीही जरांगे हे फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. या सर्वाचा अभ्यास केला असता हे सर्व नकली भांडण असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. ओबीसी ने भाजपलाच मतदान करावे हा या पाठीमागे उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला.
ओबीसी समाजाचे आरक्षण बचावासाठी मोठे मेळावे होत आहेत. परंतु याला राजकीय चेहरा मतांच्या स्वरूपात आला पाहिजे. ओबीसी हा राजकीय चेहरा झाला व त्यांचे शंभर आमदार निवडून आले तरच आरक्षण टिकेल असा दावा त्यांनी केला.
मराठा ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष
लोकसभा निवडणुकीत जालना व बीड येथे मराठा ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष दिसून आला. परंतु आता हा संघर्ष नांदेड, संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात पोहोचला आहे. तर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर येथेही ही कीड वाढत आहे. मराठा समाजाने मराठा नेत्याला व ओबीसी ने ओबीसीला मतदान करावे ही राजकीय भूमिका झाली. परंतु ही भूमिका सामाजिक स्तरावर पसरल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एकमेकांच्या दुकानातून खरेदी न करणे, संभाषण न करणे असे प्रकार वाढत आहेत. यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.