मुंबई,दि.३०: प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून ‘इंडिया’ या आघाडीची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे. अशातच प्रकाश आंबेडकरांनी एक मोठी घोषणा केली असून त्यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागा लढवणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले की, त्यांचा पक्ष २०२४ च्या निवडणुकीत सर्व ४८ लोकसभेच्या जागा लढवेल. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू. लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाने सुरू केली असून, मी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “VBA लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे आणि ऑक्टोबरपासून मी राज्याचा दौरा करणार आहे. मी स्वतः अकोल्यातून निवडणूक लढवणार आहे. आमचा पक्ष विरोधी आघाडी स्थापन करण्यास उत्सुक होता. आमची बाजू मांडून आम्ही त्या दिशेने पावले टाकली होती. बिगर भाजप आघाडी आमच्या मनात होती”, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले. खरं तर वंचित बहुजन आघाडीने अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) सोबत युती केली आहे. ही युती अद्याप शाबूत असली तरी निवडणूकपूर्व आघाडीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिल्याचे दिसते.