मुंबई,दि.४: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे ही मागणी केली आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. ओबीसी आरक्षण बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
यवतमाळ येथे प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेत उपस्थित होते. यावेळी आंबेडकर यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळात १९० कुणबी मराठा आमदार आहेत. यात फक्त ११ ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं.
ओबीसी आरक्षणाला धोका
“कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मराठ्यांसोबत आहे, असं सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत नाही. म्हणून मी तुम्हाला सावध रहा असं सांगत आहे. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.