बुलढाणा,दि.2: वंचित बहुजन आघाडी अजूनही इंडिया आघाडीचा भाग नाही, यावरून प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युती झाली आहे, पण वंचित बहुजन आघाडी अजूनही इंडिया आघाडीचा भाग नाही. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रणही वंचितला देण्यात आलं नव्हतं. इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यावरून प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावला.
मात्र लग्नासाठी दोन भटजींचा अडथळा
‘वंचित बहुजन आघाडीचा शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर साखरपुडा झाला आहे, मात्र, लग्नासाठी दोन भटजींचा अडथळा असल्याचं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन भटजी तारखी काढत नाही तोपर्यंत लग्न होत नाही’, असा निशाणा प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या या टोल्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
‘प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद सुरू आहे, यावर आता भाष्य करणं आवश्यक वाटत नाही. आमची तीन पक्षांची आघाडी आहे, त्यात आणखी पक्ष येत आहेत,’ असं अरविंद सावंत म्हणाले. दुसरीकडे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरेंनी कितीही आदळआपट केली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकरांचं वावडं आहे. प्रकाश आंबेडकर कोणताही निर्णय विचाराअंती घेत असतात. आघाडीची युती होणारच नाही. आघाडीची बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर त्यांची ताकद नक्कीच दाखवून देतील,’ असं संजय शिरसाट म्हणाले.