प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला निवडणूकपूर्व अंदाज

0

मुंबई,दि.5: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाज वर्तवला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून वर्ष बाकी आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. संपूर्ण देशाची परिस्थिती आणि राज्यनिहाय निवडणूकपूर्व अंदाज वर्तवले जात आहेत.

हे अंदाज आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच निवडणूकपूर्व अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात आकडेवारी नाही. कोणता पक्ष विजयी होणार? कुणाला किती जागा मिळणार? याचा हा अंदाज नाहीये. तर निवडणुकीपूर्व देशात काय होऊ शकतं? देशाची परिस्थिती काय असू शकते? याचा अंदाज आंबेडकर यांनी वर्तवला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला निवडणूकपूर्व अंदाज

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत. एक प्रकारे त्यांनी भविष्यातील संकटाची माहितीच आपल्या ट्विटमधून दिली आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवली जाईल

द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या ‘प्ले बूक’ मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली – हे आणि असे बरेच काही निवडले जाईल. तसेच भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल, अशी भीतीही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाजात व्यक्त केली आहे.

काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल

ट्विच्या शेवटी त्यांनी भाजप-RSS ची योजना भारतीय प्रजासत्ताकाला निवडणुकीतल्या फायद्यासाठी ‘भयभीत प्रजासत्ताक’ मध्ये रूपांतरित करण्याची असल्याचा आरोप केला आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच असा अंदाज वर्तवला आहे. इतर निवडणूकपूर्व अंदाजाच्या पलिकडचा हा अंदाज आहे. त्यातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here