मुंबई,दि.16: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी करिता 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
अशातच प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, सलाईन, इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात ZEE24 तास या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं पाऊल घेतलं असल्याचं दिसत आहे. त्यांना जी काही औषधं, सलाईन, जेवणं, ज्यूस दिला जात आहे, ते आधी तपासलं जावं. यानंतरच त्यांना या गोष्टी दिल्या जाव्यात. राज्य सरकार अशी व्यवस्था करेल अशी अपेक्षा मी करत आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.