मुंबई,दि.2: Aryan khan Drug Case: मुंबईतील चर्चित आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचे शुक्रवारी निधन झाले. त्याचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल याचे चेंबूरमधील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर प्रभाकर साईल हे नाव चर्चेत आले.
आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी गोसावी यांच्यासोबत असल्याचा दावा केला होता. प्रभाकरने केपी गोसावी सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटींची फोन करून मागणी केली होती, चर्चेअंती तडजोड करत 18 कोटींचा सौदा फिक्स करण्यासाठी बोलत असल्याचे ऐकले असल्याचा खुलासा केला होता.
साईलने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे 25 कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलं होतं.