शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण; केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

0

ठाणे,दि.१५ः अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित करणे अभिनेत्री केतकी चितळेला भोवलं आहे. या प्रकरणी केतकीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. काल (शनिवार) ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केलेली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली.

केतकी चितळेने केलेल्या पोस्टवरुन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशाप्रकारच्या आक्षेपार्ह भाषेच्या वापराला विरोध केला आहे.

आज न्यायालयात केतकीने तिची बाजू मांडण्यासाठी वकील न घेता स्वतःच युक्तिवाद केला. केतकीला सकाळीच सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर, या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी केतकी चितळे विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे. यावरून तिच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक देखील केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here