मुंबई,दि.३: ठाकरे गटाच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांना परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. यातच आता महाविकास आघाडी टिकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या एका खासदाराने याबाबत विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार यांनी बंड केले आणि शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले. आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले असून महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
शिवसेना ठाकरे गटातील आमदारांची मुंबईत बैठक होणार असून महाविकास आघाडी आणि पुढील वाटचालीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडून येणाऱ्या निवडणुकात स्वबळावर लढेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करतील. परंतु, एक मात्र नक्की की, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि शिवसैनिकांना असे वाटतेय की, उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र चलो, अकेला चलो हा नारा द्यावा आणि राजकारणाच्या पुढच्या सर्व कामकाजात सहभागी व्हावे. अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले. एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन भाजपकडे गेले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर एकाच वर्षामध्ये राष्ट्रवादीतही फूट पडल्याने मोठा राजकीय भूकंप झाला असून, आता महाविकास आघाडीमध्ये काही बिघाड होतोय का, याकडे लक्ष असणार आहे.