सोलापूर,दि.18: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘बीबीसी मराठी’ने शरद पवार यांची मुलाखत घेतली. बीबीसी मराठीच्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना दिले. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उभे केले. यामुळे खासदार सुप्रिया सुळे विरूध्द सुनेत्रा पवार अशी लढत झाली.
पक्षात पडलेली फूट पवार घराण्यात फूट पडण्यास कारणीभूत झाली. अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीच्या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी भाजपला हेच हवं होतं, अशी टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले की, “हे घडलं नसतं तर आनंद झाला असता. ज्यांच्या विरुद्ध हा संघर्ष उभा केला त्या व्यक्ती कधी राजकारणात किंवा समाजकारणात नव्हत्या. माझी मुलगी तीन वेळा संसदेत निवडून गेली आहे. त्याआधी राज्यसभेत गेली होती. पण लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे.”
पुन्हा एकत्र यायचं झाल्यास किंवा राजकारणात गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्यालं का? असा प्रश्न ‘बीबीसी मराठी’च्या मुलाखतीत शरद पवार यांना विचारला.
अजितचा स्वभाव…
त्यावर उत्तर देताना, “ती वेळ येणार नाही. कारण, अजितचा स्वभाव मला माहिती आहे. तो कधीच कोणासमोर हात पसरणार नाही,”असं उत्तर शरद पवारांनी दिलं. शरद पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.