सोलापूर,दि.19: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याबाबत मोठा दावा केला. प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपाबरोबर जाण्यासाठी आग्रही होते, असं पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी केलेला संबंधित दावा खरा असल्याची कबुली खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या दाव्यानंतर कबुली दिली आहे. त्याचवेळी आपण शरद पवार यांच्यासोबत का राहिलो, याचंही स्पष्टीकरण दिलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कबुलीनंतर त्यांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती हे आता स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा Phalodi Satta Bazar Prediction: फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज, भाजपाला मिळणार इतक्या जागा
प्रफुल्ल पटेल यांनी X या सोशल मिडीयावर म्हटले आहे की, ‘होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.’
‘हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे!’