Narayan Rane On Ajit Pawar: “माझ्या फंद्यात पडू नका, नाहीतर मी पुण्याला येऊन…” नारायण राणे

0

मुंबई,दि.२५: Narayan Rane On Ajit Pawar: भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी अलीकडेच नारायण राणे यांच्यावर टोलेबाजी केली होती. ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं, अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.

नारायण राणे यांचा अजित पवारांना इशारा | Narayan Rane On Ajit Pawar

अजित पवारांच्या या टोलेबाजीला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन त्यांचे बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं | Narayan Rane

यावेळी अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले की, अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. तो ज्याप्रकारचा राजकारणी आहे, त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये. “माझ्या फंद्यात पडू नका, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवेन…” असा थेट इशारा नारायण राणेंनी दिला.

नारायण राणे पुढे म्हणाले, “माझं पहिलं कार्यक्षेत्र मुंबई आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला कोकणात पाठवलं. तिकडून मी सलग सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींनी मला वांद्रे येथून निवडणूक लढवण्यास सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी निवडणुकीसाठी उभा राहिलो. मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नव्हतो. पण महिला असो वा पुरुष असो… उमेदवार हा उमेदवार असतो.”

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत म्हणाले, “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. त्यावेळी सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असा टोला अजित पवारांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here