Nana Patole On Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.८: Nana Patole On Sharad Pawar: मागील काही दिवसांपासून काँग्रेसने अदानी प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीला धारेवर धरलं आहे. हिंडेनबर्ग संस्थेनं जारी केलेल्या अहवालावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदानी समूहावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावर मतप्रदर्शन केलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

“हिंडेनबर्ग कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? हेही माहीत नव्हतं. अशा विषयांवर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदानींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं,” असं विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या विधानानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

Nana Patole On Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

शरद पवारांच्या या विधानावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी जी भूमिका मांडली, तीच त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यांना ती लखलाभ, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

Nana Patole On Sharad Pawar
नाना पटोले

गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “देशातील जनतेचे एलआयसी व एसबीआयमध्ये असलेले पैसे आणि कर्मचाऱ्यांचा पीएफ (प्रोव्हिडंट फंड किंवा उदरनिर्वाह निधी) खोट्या कंपन्या दाखवून अदानी समूहाने लुटला आहे. त्याबद्दलचं सगळं चित्र जनतेसमोर आलं आहे. हे सगळं सुरू असताना जेपीसीकडून (संयुक्त संसदीय समिती) तपास करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय अडचण आहे? मोदी व अदानी यांचे संबंध काय आहेत? हे प्रश्न सातत्याने काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले पक्षांनी लोकसभेत विचारले आहेत. त्यामुळे ‘चोर के दाढी में तिनका’ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.”

“काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. या देशातील लोकांची आर्थिक लूट होत असताना काँग्रेस शांत बसणार नाही. काँग्रेस जेपीसीची मागणी करेल, यावर काँग्रेस अटळ आहे. शरद पवारांनी जी काही भूमिका मांडली, ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यांना ती लखलाभ. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनपर्यंत अदाणी प्रकरणावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे ‘दाल में कुछ काला है’, असं दिसतंय किंवा पूर्ण डाळच काळी असेल. अदाणी आणि मोदींच्या संबंधांबाबत राहुल गांधींनी संसदेत जी भूमिका मांडली, त्यानुसार काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे,” असंही नाना पटोले म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here