मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा

0

अहमदनगर,दि.23: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून सुरु असलेले छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता राजकीय व्यासपीठावर जाऊन पोहचले आहे. कारण, छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, “छगन भुजबळ यांना भाजपकडून काही ऑफर आली असेल. गृहमंत्री काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवत देखील नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का?, याबाबत आम्हाला शंका येत आहे. भुजबळ यांच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नसल्याने आम्ही शंका का घेऊ नये. भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना?, कारण त्यांना पलटी मारण्याची सवय आहे. आतापर्यंत त्यांनी दहा ते पंधरा पलट्या मारल्या आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना?,” असे जरांगे पाटील म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मराठा आरक्षणासाठीचे लागलेले होर्डिंग फाडण्यात आले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. होर्डिंग फाडल्याने काही होणार नाही. मात्र, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितले पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे?, हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे. अंबडमध्ये ओबीसी सभा झाली, मात्र आम्ही एकही कुणाचं बॅनर फाडले नाही. होर्डिंग फाडल्याने आरक्षण घेण्यापासून लोकांना रोखता येणार आहे का?, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना थांबवला पाहिजे. होर्डिंग फाडणाऱ्यांना बहुतेक सरकारनेच पाठबळ दिले असेल,” असेही जरांगे म्हणाले.

दौऱ्याची आज बीड जिल्ह्यात सांगता

मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याची आज बीड जिल्ह्यात सांगता होणार असून, नऊ दिवसानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी या आपल्या गावी पोहोचणार आहेत. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये मुक्कामी असलेले जरांगे थोड्याच वेळात ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासा गावी दाखल होतील. कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरांचे दर्शन घेऊन नगरपंचायत चौकात त्यांची आजची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर शेवगाव आणि बोधेगावला सभा घेऊन सायंकाळी बीड जिल्ह्यात ते प्रवेश करतील. तसेच बीडच्या गेवराईत सभा घेतल्यानंतर बाजारतळ येथे जरांगेच्या दौऱ्याची सांगता होईल. दरम्यान आजच्या दिवशी जरांगे पाटील नक्की काय बोलणार? कोणावर निशाणा साधणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here