नवी दिल्ली,दि.२७: Kharge On Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (Narendra Modi) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. यावेळी खर्गे यांनी केंद्र सरकार लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात एकजुटीनं लढलं पाहिजे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खर्गेंचा तोल ढळला. त्यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त टीका केली.
काय म्हणाले खर्गे? | Kharge On Modi
छत्तीसगडमध्ये झालेल्या काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना खर्गे यांनी मोदींबाबत प्रक्षोभक भाषेचा वापर केला. खर्गे म्हणाले की, तुझ्यासारखे खूपजण आले आणि निघून गेले. खर्गे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, तुझ्या ५६ इंच छातीचं काय करायचं. लोकांना अन्न आणि रोजगार दे. जर ही छाती एका इंचाने जरी कमी झाली तरी काही अडचण नाही. दुबळा असल्याने कुणी मरत नाही.
आम्ही केवळ अदानींबाबत प्रश्न विचारले होते | Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, केंद्रात असलेले सरकार लोकशाहीवादी नाही आहे. हे सरकार जनतेसाठी काम करत नाही. हे सरकार केवळ आपली हुकूमशाही चालवते. ते म्हणाले की, आम्ही संसदेमध्ये गरीब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसंबंधीचे विषय मांडण्याचे स्वातंत्र मिळत नाही आहे. माझं भाषण आणि राहुल गांधींचं भाषण हटवण्याात आलं. आम्ही कुठल्याही अपमानजनक शब्दांचा वापर केला नव्हता. आम्ही केवळ अदानींबाबत प्रश्न विचारले होते.
ही कुठली जादू आहे?
२००४ च्या आधी अदानींची संपत्ती ३ हजार कोटी रुपये होती. ती २०१४ मध्ये ५० हजार कोटी झाली. २०२१ ते २०२३ या दरम्यान, ती १३ पट वाढली. ही कुठली जादू आहे. अदानीला तुम्ही असा कुठला मंत्र दिला, आम्हालाही तो सांगा. एक रुपया अडीच वर्षात कसा १३ रुपये होतो. तसेच एक लाख रुपयांचे १३ लाख रुपये होतात, ते स्पष्ट करा.
आज आपण अशा लोकशाहीमध्ये आहोत, जिथे बोलण्याचं, लिहिण्याचं, खाण्याचं स्वातंत्र्य संपुष्टात आलं आहे. आज कुणी खरं बोलला तर त्याला तुरुंगात पाठवलं जातं. अधिवेशन सुरू असताना धडाधड धाडी पडल्याचे मी पाहिले नव्हते. तुम्ही कोणाला घाबरवत आहात, छत्तीसगडमधील जनता घाबरणार नाही, असेही खर्गे यांनी म्हणाले.