पुणे,दि.१५: राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचं निश्चित केलं आहे. खरा पक्ष कोणाचा याचा निर्णय ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार की अजित पवार यांचा, हे ६ ऑक्टोबरला कळेल. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा केंद्रीय निवडणूक आयोग घेणार निर्णय | Jayant Patil
जयंत पाटील म्हणाले, “निवडणूक आयोगासमोर आमची बाजू मांडू. आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं होतं. पण, आयोगानं आमची बाजू न ऐकता फूट असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत आम्ही वकीलांचा सल्ला घेत आहे. निवडणूक आयोग अयोग्य वागत आहे, असा त्याचा अर्थ दिसतो.”
अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या बैठकीला उपस्थित नव्हते. याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. कदाचित त्यांना दुसरी काम असतील. त्यामुळे येणं शक्य झालं नसेल.”
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरूनही जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. “सरकारी कर्मचाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. तिथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणं चुकीचं आहे. जबाबदारीची पदेही कंत्राटी पद्धतीनं भरली तर अतिशय गंभीर प्रश्न आहे. पैसे वाचवण्यासाठी बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन काही कामे करून घेतली आणि त्यात चूका आढळल्या, तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. कंत्राटी कर्मचारी नियुक्तील मर्यादा असल्या पाहिजे. अन्यथा सरकारच कंत्राटी पद्धतीनं चालवायला लागेल,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं.