Amol Mitkari: एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाचा उल्लेख, अमोल मिटकरी यांची टीका

0

मुंबई,दि.२३: Amol Mitkari On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाचा उल्लेख केला यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी यावर टीका केली. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग गुलाम असल्यासारखे वागत असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने दबावाखाली हा निर्णय दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही निवडणूक आयोगाच्या निकालावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे? | Eknath Shinde

एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवीन पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. याबाबत बुधवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी चुकून ते निवडणूक आयोग म्हणाले आणि नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले.

अमोल मिटकरी यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका | Amol Mitkari On Eknath Shinde

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. कालही पुन्हा पत्र दिले आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत सरकार सहमत आहे,’ असे ते म्हणाले. अलीकडेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हदेखील शिंदे गटाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय दिल्यामुळे आयोगाबाबत चर्चा असतानाच शिंदे यांनी हे अजब वक्तव्य केल्यामुळे व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि ‘यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले,’ अशी खोचक टीका केली.  

एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ व्हायरल होत असून, आता एमपीएससीचा निकालही निवडणूक आयोग देणार वाटते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या व्हिडिओवरून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग, कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे असे म्हणले गेले असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here