Ajit Pawar On Sharad Pawar: अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले 2019 ला…

0

मुंबई,दि.5: Ajit Pawar On Sharad Pawar: राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला विधानसभेचा निकाल लागला. तेव्हा काय परिस्थिती होती हे तुम्हाला माहितच आहे. त्यावेळी मोठ्या उद्योगपतीच्या घरी आमची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, भाजपचे वरिष्ठ नेते, उद्योगपती, मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या असा दावा अजित पवार यानी केला आहे.

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar On Sharad Pawar

पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यावेळी बोलताना मला आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आले की कुठेही बोलू नका. नेत्यांनी सांगितलं म्हणून आम्ही कुठेही बोललो नाहीत. मला कोणालाही बदनाम होऊ द्यायचं नाही. हा सगळा खेळ सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगण्यात आलं आता आपल्याला शिवसेनेसोबत जायचं आहे. 2017 ला शिवसेना जातीयवादी आणि दोन वर्षांनी तो मित्रपक्ष झाला, आणि ज्या भाजपासोबत जाणार होतो तो पक्ष जातीयवादी झाला असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.

आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक आहे आमची?

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. ‘आजही ते माझं दैवत आहेत आजही ते श्रद्धास्थान आहेत. एखादा माणूस नोकरीला लागला की 58 व्या वर्षी रिटायर होतो. राजकीय जीवनात असेल तर भाजपमध्ये 75 व्या वर्षी रिटायर केलं जातं. चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक आहे आमची?

वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेले. माझी घोडचूक झाली तेव्हा मीही गेलो होतो. वय 82 झालं 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही, तुम्ही आशिर्वाद द्या ना. तुम्ही शतायुषी व्हावं. 2 मे ला सांगितलं मी राजीनामा देतो, तुम्ही सगळे प्रमुख बसा कमिटी बनवा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं सांगितलं. आम्ही तयार होतो. मग दोन दिवसात काय घडलं कुणास ठावूक, त्यांनी राजीनामा परत मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिलाच कशाला तेही कळलं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here