पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर पोलिसांची धाड, 6 तरुणींची सुटका

0

पुणे,दि.11: पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायबर पोलीस आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी लॉजवर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दलालाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच लॉजचा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायात अडकलेल्या सहा तरुणींची सुटका केली आहे.

रवीश शेट्टी असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील उडपी येथील रहिवासी आहे. आरोपी शेट्टी हा खडकी-दौंड येथील सुर्या लॉजवर सहा तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरू होता. अत्यंत गुप्तता पाळून हा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे बरेच दिवस याची खबर पोलिसांना देखील नव्हती.

दरम्यान, सोलापूर-पुणे महामार्गालगत दौंड तालुक्यातील खडकी येथील सुर्या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती एका लोकल पत्रकाराने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली होती. यानंतर देशमुख यांनी सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार संबंधित पथकाने यवत पोलिसांच्या मदतीने सुर्या लॉजवर छापा टाकला आहे.

यावेळी कारवाई करत पोलिसांनी लॉजवर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रवीश शेट्टीला अटक केली आहे. तसेच त्याचे अन्य काही सहकारी आणि लॉजच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या सहा तरुणींची सुटका केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here