PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72 वा वाढदिवस, आज जन्मणाऱ्या बालकांना दिली जाणार सोन्याची अंगठी

0

दि.17: PM Modi Birthday: आज (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडून मोदींच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. तर तामिळनाडू भाजपाकडून आगळीवेगळी घोषणा केली आहे. तामिळनाडूत आज जन्मणाऱ्या बालकांना थेट सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. 

भाजपाच्या तामिळनाडू युनिटनं राज्यात आज जन्म घेणाऱ्या बालकांना सोन्यीच अंगठी देण्याची घोषणा केली आहे. तसंच यासोबतच मासे वाटण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. राज्यात जवळपास 720 किलो मासे वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्या आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या घोषणेबद्दल माहिती देताना चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची या उपक्रमासाठी निवड केली असल्याचं सांगितलं. या रुग्णालयात 17 सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत 5 हजार रुपये असणार आहे.

आजचा दिवस पंतप्रधानांसाठी खूप व्यस्त असणार आहे. आज पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून भारतात आणलेले 8 चित्ते सोडण्यात येणार आहेत. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातही 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ (Seva Pandharvada) आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Birthday) यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

विविध राजकीय नेत्यांकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपच्या नेत्यांसोबतच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here