अहमदनगरच्या एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीमध्ये झळकले औरंगजेबाचे फोटो

0

अहमदनगर,दि.5: अहमदनगरच्या एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो झळकवल्याचा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्याच आठवड्यात अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा केली. यानंतर आता अहमदनगरच्या एका कार्यक्रमाच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागात दर्गाच्या संदलचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुकुंद नगर भागातील मुलांनी डीजे लावला होता, त्यामध्ये एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जागीदार यांच्यासह अनेक युवकांनी हातामध्ये औरंगजेबाचे फोटो झळकावले. याच्या तीव्र प्रतिक्रिया नगर जिल्ह्यामध्ये उमटत आहेत. अनेक युवकांच्या हातामध्ये औरंगजेबाचे फोटो दिसल्याने नगरमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.

औरंगजेबाचे फोटो झळकले

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. नगरमध्ये घडलेल्या घटनेबाबत मी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पोलीस योग्य ती कारवाई करतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर भिंगार पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जागीरदार, अथनान शेख, शेख सरवर जावेद शेख यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये उरूसाच्या संदल मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकावणारे देशद्रोही, शिवद्रोही आहेत. यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्याहला हवेत. हा दंगल घडवण्याचा कट आहे, ज्यांना कुणी जुलमी, अत्याचारी औरंगजेबाचा पुळका असेल अशा औरंगजेबाच्या वारसदारांनी पाकिस्तानात जाऊन राहावे, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी स्वतः पोलीस फिर्यादी झाले असून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख उर्फ खडा, शेख सरवर, जावेद शेख उर्फ गब्बर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर या प्रकारावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here