भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कचराकुंडीवर, काँग्रेसने व्यक्त केला संताप

0

नवी दिल्ली,दि.६: भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणीमुळे भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली. वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती दिली. तसेच, या वक्तव्याविरोधात निषेधही व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली. एकीकडे हा वाद असताना आता अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने हा फोटो ट्विट करत अरब देशातील या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोसह त्यांनी संताप व्यक्त करणारा मजकूरही लिहिला आहे. मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्विकार होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी, असे ट्विट राजपूत यांनी केले आहे. अंबरीष गुप्ता यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कचराकुंडीवर टाकल्याने अरब देशाविरुद्ध भारतात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे तीव्र पडसादही उमटताना दिसून येत आहे. 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील एक ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचं कृत्य अतिशय संतापजनक आहे. या कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. नरेंद्र मोदी आमचे विरोधक असले आणि त्यांची विचारसरणी आम्हाला पटत नसली तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा विरोध करू!”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here