मुंबई,दि.१: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ अॅागस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा ४था दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मराठा समाज मुंबईत दाखल होत आहे.
मनोज जरांगे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आजच याचिकेवर सुनावणी होणार आहे. एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
आझाद मैदानावर झालेल्या प्रचंड जनसमुदायाने दक्षिण मुंबई संपूर्ण गोंधळात टाकली आहे. अनियंत्रित रहदारी आणि वाढत्या गर्दीमुळे शहर ठप्प झाले आहे. दैनंदिन जीवन आणि व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. दुकाने आणि बाजारपेठांमधील आठवड्याच्या शेवटी विक्री नगण्य पातळीवर घसरली आहे,. ज्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक मालक हतबल झाले आहेत. व्यावसायिक बैठका पुढे ढकलल्या जात आहेत, कार्यालये विस्कळीत होत आहेत आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. हा गतिरोध चालू राहू शकत नाही. सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सरकारी चर्चा किंवा उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची तातडीने आवश्यकता आहे. अन्यथा, दक्षिण मुंबईच्या व्यवसायाचे आणि उपजीविकेचे दीर्घकालीन नुकसान विनाशकारी असेल. मुंबई हायजॅक झाल्यासारखी वाटते आहे असा संताप फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे (FRTWA) अध्यक्ष विरेन शाह यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास का, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते पोलीस संरक्षणात उच्च न्यायालयात हजर झाले आहेत. या याचिकेच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.