मुंबई,दि.8: मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मोठे आंदोलन सुरू केले होते. संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाला. राज्य सरकारने फेब्रुवारीत एक दिवसीय अधिवेशन बोलवत 10 टक्के मराठा आरक्षण दिले.
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊ केल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची भरती न्यायालयाच्या आदेशाअधीन राहील असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
या सुनावणीत कुठलीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे.
राज्यात 17 हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच दोन हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच 50 हजार मेडिकल विद्यार्थ्यांच्या प्रवेश मराठा आरक्षणानुसार होणार होता. त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. त्यावर न्यायालयाने कुठलीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश देत पुढील सुनावणी मंगळवारी 12 मार्च रोजी ठेवली.
तर भरतीही रद्द होऊ शकते…
न्यायालयाच्या निर्देशांनुसार मेडिकलच्या अॅडमिशन अर्थात वैद्यकिय शिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया आणि भरती प्रक्रिया या दोन्हीसाठी उच्च न्यायालयाचा निर्णय लागू राहणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सध्या प्रवेश प्रक्रिया/ अॅडमिशन किंवा भरती प्रक्रिया सुरु करण्यास हरकत नाही, पण उच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो प्रवेशासह भरती प्रक्रियेवरही लागू असेल (म्हणजेच जर आरक्षण रद्द झालं, तर भरतीही रद्द होऊ शकते).