लातूरमध्ये आढळला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण, विदेशातून आलेल्या व्यक्ती झाला बाधित

0

लातूर,दि.13: महाराष्ट्रातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळत आहेत. अनेक देशांमध्ये सध्या ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. डोंबिवली, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरनंतर आता लातूरमध्ये (Latur) ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. हाय रिस्क देशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं तपासातून स्पष्ट झालेय. या व्यक्तीचे जिनोम सिक्वेसिंगसाठी नमुने पुण्याला पाठवले होते. यामध्ये हा व्यक्ती ओमिक्रॉन बाधित आढळला आहे. या व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

लातुरात गेल्या काही दिवसांत 94 नागरिक परदेशातून दाखल झाले होते. त्यामधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. लातुरात आलेल्या 94 जणांपैकी काही जण राज्य शासनाने जाहीर केलेल्या अति जोखमीच्या देशातून आलेले आहेत. तर उर्वरित नागरिक कमी जोखमीच्या देशातून आलेले आहेत.

विदेशातून आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामधील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. या पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे जीनोम सिक्वेनसिंग करण्यासाठी नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रामध्ये पाठवण्यात आले. सोमवारी रिपोर्टमध्ये तो व्यक्ती ओमिक्रॉनबाधित असल्याचं समोर आलं. या व्यक्तीवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. लक्षणे सौम्य आहेत मात्र प्रशासन सर्व काळजी घेत आहे. ओमायक्रॉन बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांना विलगीकरणातही ठेवण्यात येईल.

आज राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. पुणे व लातूरमध्ये प्रत्येकी एक असे रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या 20 वर पोहोचली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here