परभणी,दि.11: परभणी बंदला हिंसक वळण लागले असून जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. काल समाजकंटकाकडून परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेची विटंबना करण्यात आली. विटंबनेनंतर बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून परभणीत कडकडीत बंद होता. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली.
आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक काही भागात दगडफेकीच्या घटना समोर आल्या. पोलीस प्रशासन आणि आंदोलक यांच्यात काही भागात बाचाबाची झाली. दुपारी आंदोलन चिघळल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, आंदोलक यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले. मात्र, याच वेळी अचानक आंदोलक महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. एकीकडे शहरात तणावपूर्ण शांतता असताना पुन्हा आंदोलन चिघळल्याची परिस्थिती निर्माण झाली.
बाबासाहेब यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. बाबासाहेब यांच्या पुतळ्या बाबत घडलेली घटना अनेक दिवसांनी घडली आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेब यांचे पुतळे आहेत. ते उभे करण्यात मराठा समाजाचा देखील मोठा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज या कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये. यामामगे ज्याचा हात असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री या प्रकारांची चौकशी करून आरोपींना शिक्षा करतील हा विश्वास आहे, असं रिपाइंचे नेते रामदास आठवले म्हणाले आहेत.