नवी दिल्ली,दि.16:: पाकिस्तानी मीडियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे कौतुक करण्यात आले आहे. (Pakistan on Narendra Modi) भारतात अनेक राजकीय पक्ष जरी मोदी यांच्या धोरणांचा विरोध करीत असेल तरीही जगातील अनेक देश मोदींचे कौतुक करताना दिसून आले आहे. पाकिस्तानातील एका आघाडीच्या वृत्तपत्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच (PM Narendra Modi) जोरदार कौतुक केलं आहे. वृत्तपत्रानं म्हटलं की, नरेंद्र मोदींनापाकिस्तानमध्ये द्वेषानं पाहिलं जात असलं तरी त्यांनी भारताला एक ब्रँड बनवलं आहे. त्यांच्यापूर्वी हे कुणीही करू शकलेलं नाही. मोदींनी भारताला त्या मार्गावर आणलं आहे, जिथून भारताचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताचा दर्जा वाढलाय. वृत्तपत्रानेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचंही कौतुक केलं आहे.
नरेंद्र मोदी यांचे कौतुक
भारतीय परराष्ट्र धोरणाचे खूप कौतुक
पाकिस्तानतील आघाडीचं वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूननं आपल्या एका लेखात लिहिलं की, पीएम मोदींनी भारताला अशा टप्प्यावर आणलं आहे, जिथून देशाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे परराष्ट्र धोरण कार्यक्षमतेनं चालत असून त्याचा जीडीपी तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढला आहे. भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना प्रसिद्ध राजकीय, सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषक शहजाद चौधरी म्हणाले की, भारत हे गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आलंय. भारतानं पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर स्वतःचं क्षेत्र स्थापित केलं आहे.
रशियासोबतच्या मैत्रीवर प्रतिक्रिया
चौधरी पुढे म्हणाले, युक्रेन युद्धामुळे रशियावर कठोर निर्बंध लादले गेले असतानाही भारताने रशियाकडून अनुदानित दराने तेल खरेदी करणे हा भारतीय परराष्ट्र धोरणाचा विजय आहे. रशियावर अमेरिकेचे निर्बंध आहेत आणि भारताशिवाय कोणीही रशियाशी मुक्तपणे व्यापार करू शकत नाही. भारत स्वत:च्या अटींवर रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि परदेशात विकून डॉलरही कमावत आहे. जगातील दोन विरोधी लष्करी महासत्ता (अमेरिका आणि रशिया) भारताला आपला मित्र मानतात.
भारताचे संपूर्ण जगाशी चांगले संबंध
ते पुढे लिहितात की, भारत संपूर्ण जगासाठी प्रासंगिक झाला आहे. भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. 2037 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे त्याचे लक्ष्य आहे. भारताचा परकीय चलनाचा साठाही US $600 अब्जांपेक्षा जास्त आहे, तर पाकिस्तानकडे आता फक्त साडेचार अब्ज डॉलर शिल्लक आहेत. भारताकडे दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांची लष्करी क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. अब्जाधीशांच्या जागतिक यादीत 140 भारतीय आहेत, त्यापैकी चार टॉप 100 मध्ये आहेत.
भारत-पाकिस्तान संबंधांवर म्हणाले…
चौधरी लिहितात, भारताने प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला मागं टाकलं आहे. दोन्ही देशांच्या विकासामध्ये एक खोल दरी निर्माण झालीये, जी कधीही भरून काढता येणार नाही. भारतानं जागतिक स्तरावर आपली छाप सोडलीये. ते G-7 चे अध्यक्ष आहेत आणि G-20 चे सदस्य देखील आहेत. यावर कोणाचा विश्वास असो वा नसो, भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवून पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या विचारसरणीत दिवाळखोरी आहे आणि त्यामुळेच ते बरबाद होत आहे. आपली अर्थव्यवस्था चांगली असेल तेव्हाच आपण चांगले काम करू शकतो, असंही ते म्हणाले.