Online Fraud: Google वर बँकेचा फोन नंबर शोधणे पडले महागात, चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांना गंडा

0

अंबरनाथ,दि.१८: Google वर बँकेचा नंबर शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. त्या व्यक्तीची चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाली आहे. अनेकजण कुठलीही माहिती किंवा एखाद्या कंपनीचा ग्राहक क्रमांक शोधण्यासाठी Google वर सर्च करतात. अनेकवेळा यातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. गुगलवरून बँकेचा नंबर शाेधून त्यावरून काॅल करणे बदलापूर शहरातील निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. त्यानंतर अनोळखी नंबरवरून काॅल करून एका व्यक्तीने त्यांना चार लाख ८६ हजार ९३९ रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार १६ जानेवारीला घडला आहे. याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

यादवनगर परिसरात राहणारे निवृत्त लष्करी कर्मचारी प्रमोद मर्चंडे यांचे एसबीआय बँकेचे ऑनलाइन बँकिंग ॲप चालत नसल्याने त्यांनी गुगलवर शोध घेऊन कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी टोलफ्री नंबरवर कॉल करून बँकेचे ऑनलाइन ॲप चालू होत नसल्याची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल आला. त्यावेळी त्यांच्याकडून सर्व अकाउंटचे डिटेल्स घेतले. त्यानंतर त्यांना एनी डेस्क हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. मर्चंडे यांनी हे अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर कॉल केलेल्या अनाेळखी व्यक्तींनी बँकेचा रजिस्टर मोबाइल नंबर बदलला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून चार लाख ८६ हजार ९३९ रुपये काढून घेतले.

नंबर बदलल्याचा मेसेजही मर्चंडे यांना आला होता. बँकेचा कर्मचारी असल्याने त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तीन दिवसांनंतर बँक बॅलन्स चेक केल्यानंतर खात्यावर अठराशे रुपये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी बँकेत संपर्क साधला असता त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचा बँकेने फॉर्म भरून घेत त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here