पंढरपूर,दि.१३: विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासुस अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. यातील फिर्यादीचे पती सचिन ढोणे, फिर्यादीची सासु यांनी फिर्यादीस मुल होत नाही, काम येत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याप्रकरणी पंढरपूर येथील सत्र न्यायाधिश लंबे यानी अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की फिर्यादी व आरोपी सचिन ढोणे यांचा विवाह दिनांक २५/०१/२०१५ रोजी झाला होता.
लग्नानंतर फिर्यादी व आरोपी हे आरोपीस डेन्मार्क येथे प्रमोशन मिळाल्याने नोकरी निमित्त गेल्यामुळे तेथे फिर्यादीस दिनांक ६/६/२०१७ मध्ये मुलगी झाली होती. त्यानंतर आरोपीनी फिर्यादीस अपमानित करुन, शिवीगाळी करुन तिच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करण्यास सुरुवात केली व फिर्यादीस तिच्या माहेरी करकंब येथे आणून सोडले होते. त्यानंतर फिर्यादी व आरोपी यांच्यात असलेला गैरसमज दुर करुन फिर्यादीस पुन्हा आरोपीकडे नांदावयास पाठविले होते. त्यावेळी फिर्यादीची सासु ही फिर्यादीला काम येत नाही म्हणून अपमान करुन शारिरीक व मानसिक छळ करुन फिर्यादीला मारहाण करीत होती.
सदरची बाब फिर्यादीने तिच्या पतीला सांगितली होती. नंतर आरोपी सचिन ढोणे यानी फिर्यादीस डेन्मार्क येथे घेवून गेला व तेथे देखील शिवीगाळ व मारहाण करुन फिर्यादीस कांही काम येत नाही, म्हणून शारिरीक व मानसिक छळ करु लागला होता . अशी फिर्याद फिर्यादीने आरोपी विरुद्ध करकंब पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर आरोपींनी अटक होण्याच्या भितीपोटी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनचा अर्ज ॲड. अभिजित इटकर व ॲड. सुरेश ( बापूसाहेब ) गायकवाड यांच्या मार्फत दाखल केला होता.
सदर अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपींच्यावतीने असा युक्तिवाद करण्यात आला की , प्रत्येक छळाचे स्वरूप हे गुन्हा म्हणता येणार नाही. तसेच सदर आरोपींनी सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात सदर फिर्यादीविरूध्द अर्ज दाखल केलेला असून, त्यामुळे चिडून जावून सदरची फिर्याद दाखल केली असा युक्तिवाद मांडला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून पंढरपूर येथील मे. सत्र न्यायाधीश लंबे यांनी सदर संशयितांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. सुरेश ( बापुसाहेब ) गायकवाड, ॲड. संतोष आवळे, ॲड. संदिप कागदे , ॲड. सागर पाटील यांनी काम पाहिले.