संभाजी ब्रिगेडच्यावतीने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

0

सोलापूर,दि.२६: किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४९ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला इतिहासात फार महत्व आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने २४ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा ३४९ वा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा मोठया उत्साहात ढोल ताशाच्या गजरात हा उत्सव साजरा करण्यात आला. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा पहिला राज्याभिषेक संपन्न झाला होता, त्यानंतर काही काळातच २४ सप्टेंबर १६७४ रोजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक करवून घेतला.

पहिल्या राज्याभिषेक सोहळ्या इतकेच दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्यालाही महत्व आहे. या ऐतिहासिक दिवसाची आठवण ठेऊन त्या इतिहासाचा जागर करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते. संभाजी ब्रिगेड गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी २४ सप्टेंबर या दिवशी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे. यावर्षी राज्‍याभिषेक सोहळयासाठी शिवभक्‍तांच्‍या हजेरीने किल्ले रायगड घोषणाच्या आवाजाने दुमदुमून गेला. हा प्रेरणादायी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी शिवभक्‍तांनी प्रचंड गर्दी केली होती.

यावेळी शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि ढोलताशांच्‍या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला होता. हजारो शिवभक्‍त हातात भगवे झेंडे घेवून नाचत होते. या सोहळ्यात कला, क्रीडा, सामजिक, राजकीय, तसेच आरोग्य क्षेत्रात विशेष कामगिरी पार पाडणाऱ्या अनेक मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यंदाचा हिरकणी पुरस्कार समृध्दी प्रशांत भुतकर यांना देण्यात आला. तसेच गंगाधर साळवी, डॉ. वारीस अन्सारी ,रामदास कळंबे, अजय पाटील, श्रीमंत झांजुर्णे, सोनाली झांजुर्णे यांना विशेष सन्मान देवून गौरविण्यात आले.

या सोहळ्याचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सचिन सावंत देसाई यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष सुधांशू मोहोड, संघटक प्रदीप कणसे, अजय भोसले, तसेच शेतकरी आघाडीचे संतोष गव्हाणे, रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले, अमर जगदाळे, सुनील पवार राजेंद्र माने, सागर देवकुळे, राहुल चव्हाण, विठ्ठल जाधव, सोमनाथ देवकुळे, धीरज साबळे आदी सोलापुरातून संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here