मुंबई,दि.१५ः केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. केतकीने फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या विषयाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी, “कोण केतकी चितळे?, मी तिला ओळखत नाही,” असं म्हटलंय. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलेली असतानाच दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणासंदर्भात भाष्य केलंय.
केतकी चितळेला अटक
केतकीने शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकुराखाली वकील नितीन भावे असा उल्लेख आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केतकीवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एककडून सुरू होता. पोलीस केतकीचा सर्वत्र शोध घेत होते. ती नवी मुंबईच्या कळंबोली भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. नंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला. तिला अटक केल्याची माहिती युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले
कोल्हापूरमध्ये असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना या केतकी चितळे प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांबद्दल आपण काय भाषा वापरतोय याचं भान हे असलं पाहिजे,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी, “अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अतिशय बेतालपणे बोललं जातं. अतिशय खालच्या दर्जाचे शब्द वापरले जातात. अशापद्धतीचे शब्द कोणीही वापरु नयेत. आता यासंदर्भात कायदा योग्य तो निर्णय घेईल,” असंही म्हटलं.
त्या ट्विटबद्दलही दिलं फडणवीसांनी स्पष्टीकरण
पाथरवाट कविता साताऱ्यामध्ये शरद पवारांनी ऐकवल्यानंतर त्याचा काटछाट करुन व्हिडीओ भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवर टाकण्यात आला. त्यामधून गदारोळ निर्माण झालाय, असं म्हणत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवर कुठलीही काटछाट केलेली नाही. मिडियामध्ये दाखवण्यात आलेल्या व्हिडीओची ती जशीच्या तशी क्लिप आहे. हवं तर चॅनेलचं नावही सांगतो पण कशाला चॅनेलचं नाव सांगू?, ते जसच्या तसं आमच्या हॅण्डलवर आलेलं आहे. यासंदर्भात कुठेही काहीही काटछाट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही,” असं फडणवीस म्हणालेत.