Odisha Raid: सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना सापडलं कोट्यवधींचं घबाड

Odisha Raid: शेजाऱ्यांच्या टेरेसवर फेकली नोटांची बंडलं भरलेली खोकी

0

नबरंगपूर,दि.२४: Odisha Raid: ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास पथकाला सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासंदर्भात सर्वच पक्षांची सरकारं त्यांच्या कार्यकाळात वेळोवेळी दावे करत आली आहेत. मात्र, अजूनही भ्रष्टाचाराला आळा घालण्यात कोणत्याही पक्षाच्या सरकारला पुरेसं यश आलेलं नाही. त्याचाच प्रत्यय नुकताच ओडिशामध्ये आला असून एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. यावेळी एखाद्या चित्रपटात शोभतील अशा नाट्यमय घडामोडींनंतर या अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून अधिकाऱ्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त केली आहे. (Odisha Raid News)

ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास पथकानं टाकला छापा | Odisha Raid

ओडिशा प्रशासकीय सेवेतला वरीष्ठ अधिकारी प्रशांतकुमार रौत यांच्या नबरंगपूर जिल्ह्यातील घरी ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास पथकानं छापा टाकला. रौत सध्या नबरंगपूर जिल्ह्यात अतिरिक्त उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहेत. जिल्ह्यातील त्यांच्या कानन विहारमधील घरी पोलिसांनी छापा टाकला. त्याचबरोबर त्यांच्या भुबनेश्वरमधील घरी आणि इतर संबंधित ठिकाणीही पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३ कोटींची रोकड जप्त केली. याचबरोबर सोन्याचे दागिने आणि इतर मालमत्ताही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पोलिसांच्या पथकानं कनान विहार येथील आरोपी अधिकाऱ्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याच्या पत्नीने रोख रक्कम भरलेले सहा खोके शेजाऱ्याच्या गच्चीवर फेकले आणि त्यांना पैसे लपवण्यास सांगितले. जेव्हा पोलीस रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजाच उघडला नाही.
पोलिसांनी तातडीने शेजाऱ्यांच्या घराच्या टेरेसवर धाव घेतली. फेकलेले खोके तपासले असता त्यातून ५०० रुपयांच्या नोटांची बंडलं सापडली. या ६ खोक्यांमधून पोलिसांना २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली.

यानंतर मात्र रौतच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. एकीकडे भुबनेश्वरच्या घरी छापा टाकला जात असताना दुसरीकडे नबरंगपूरमधील त्याच्या घरीही दुसऱ्या एका पथकानं छापा टाकला.

पोलिसांना छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. एका पुस्तकांच्या कपाटाच्या मागे भिंतीमध्ये १० लाख ३७ हजारांची रोकड लपवून ठेवली होती. तसेच, नबरंगपूरच्या घरातून पोलिसांनी ८९ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. शेजाऱ्यांच्या घरातूनही नोटांची बंडलं ठेवलेले सहा खोके पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली. त्यामुळे एकूण ३ कोटींची रक्कम पोलिसांनी या छाप्यात ताब्यात घेतली. त्याशिवाय, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्तीही पोलिसांनी ताब्यात घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here