जालना,दि.17: आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा.. एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत आज सकाळी 8 वाजेपासूनच लाखो ओबीसी समाज बांधव अंबड (जि.जालना) येथील आरक्षण बचाव एल्गार सभेसाठी दाखल झाले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नये, जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी सभेत (Jalna OBC Sabha) सर्व ओबीसी नेत्यांची मागणी केली आहे. या सभेत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळांसमोर आरक्षणावरून शरद पवारांवर अप्रत्यरित्या निशाणा साधला आहे. मराठा समाजाची वाताहत कोणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही, खरा शत्रू ओळखा, असे म्हणत भुजबळांसमोरच नाव न घेता पडळकरांनी शरद पवारांनी निशाणा साधला आहे.
दिला नवीन नारा
गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण 346 जातींचा ओबीसी समाजाला धक्का लावू नये. ओबीसीवर अन्याय झाल तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. “प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर”, हा नारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, गरीब मराठा समाजला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आरक्षणला कोणाचा विरोध नाही. परंतु, 346 जाती असलेल्या ओबीसी समाजातील जातींना धक्का न लावता आरक्षण द्या. त्यांना धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल. प्रस्थापितांना उत्तर देऊ. महाराष्ट्र समाजाची वातहात कोणी केली? ओबीसी तुमचा शत्रू नाही, तुमचा शत्रू ओळखा. 2014 साली मराठा समाजाला जसे फडणवीस यांनी आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला द्या.
पडळकरांकडून भुजबळांची स्तुती
17 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रच्या इतिहासात नोंद होईल. गटात आणि पक्षात पक्षात विभागलेले वाघाटे बछडे एकत्र आलेत आहेत. ओबीसींना सहज आरक्षण मिळालं नव्हतं.. मोठा संघर्ष उभा राहिला मग आरक्षण मिळाले. आरक्षणाची वाटमारी करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. ओबीसींना त्रास देण्याची भूमिका कोणी घेतली तर ओबीली समाज आता पूर्णपणे जागा झाला आहे. ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणून छगन भुजबळ आहे. वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचं राहत नसतो, सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही मांसच खात असतो, असे म्हणत पडळकरांनी भुजबळांची स्तुती केली.
जालना मार्ग, पाचोड मार्ग, बीड, घनसावंगी मार्गावरून सकाळी 8 वाजल्यापासून सभास्थळी येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरू झाला होता. कोणी दुचाकीवरून तर कोणी चारचाकी वाहनातून सभेसाठी अंबड शहरात दाखल झाले होते. सभास्थळी विविध गीते गात आरक्षणाचे महत्त्व विषद केले जात होते. सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते सभेसाठी एकाच मंचावर आल्याने सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.