Eknath Khadse: आता सभागृहातही भाजपा विरुद्ध एकनाथ खडसे खडाजंगी मिळणार पाहायला

0

मुंबई, दि.9: आता सभागृहातही भाजप विरुद्ध एकनाथ खडसे (Eknath Khadse) अशी खडाजंगी पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. भाजपा व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सातत्याने आक्रमकपणे एकनाथ खडसे टीका करत आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून अनेक ठिकाणी भाजपाला खिंडार पडले आहे. एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकत वाढली आहे. एक आक्रमक पवित्रा घेणारा नेता राष्ट्रवादीला मिळाला आहे.

राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या 2 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या दोन नावांमध्ये भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंना संधी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे हे विधिमंडळात येण्यासाठी उत्सुक होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही त्यांचं नाव होतं. मात्र, 12 आमदारांची नियुक्ती रखडल्याने त्यांना वेट अँड वॉच रहावे लागले. मात्र, राष्ट्रवादीने आता एकनाथ खडसेंना संधी दिल्याने ते विधिमंडळ सभागृहात दिसून येतील. त्यामुळे, आता सभागृहातही भाजप विरुद्ध खडसे अशी खडाजंगी पाहायला मिळणार आहे.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here