समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या 4 जणांना नोटीस

0

नांदेड,दि.7: लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलने सोधून काढणे सुरु केले आहे. या सेलच्या वतीने 4 जणांना नोटीस बजावली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुःखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.

उमेदवारांनी नमूद करावे खाते 

उमेदवारांना त्यांचे सर्व फेसबुक अकाउंट जमा करावे लागणार आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलामध्ये जमा केला जाणार आहे. तसेच या निर्धारित सोशल मीडीया अकाउंट वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये.

त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. दरम्यान 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास एक हजार नऊशे खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खातेधारकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

13 जणांचा शोध सुरू

नांदेड जिल्ह्यातील आणखी 13 जणांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 13 जणांच्या आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या आहेत. त्यांचे पत्ते व त्यांच्याबद्दलची माहिती तपासणी सुरू आहे. सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी या संदर्भात अधिक जागरूक असावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची,  संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here