मुंबई,दि.५: शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या तक्रारी नंतर शिवसेनेच्या 14 आमदारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. भाजपने अध्यक्षपदाची निवडणुक जिंकली तर विश्वासदर्शक ठरावातही बाजी मारली. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) यांचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, आता शिवसेना शिंदे गट व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 14 आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंना वगळले
आमचा व्हीप झुगारणाऱ्या सर्व आमदारांना आम्ही अपात्र ठरवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव दिलेले नाही, असे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. व्हिपचे पालन न केल्यामुळे भरत गोगावलेंची विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या इतर 14 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आता या आमदारांवर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.
आमचा व्हीप खरा- आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा सत्तासंघर्ष अद्याप शमलेला नाही. शिवसेना कोणाची हा प्रश्न अजूनही कायम आहे. याबाबतची कायदेशीर लढाईल सुरु आहे. दरम्यान, शिवसेना संपणार नाही, आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु, असंही आदित्य म्हणाले.
कारवाई होणार – एकनाथ शिंदे
दरम्यान, शिवसेनेच्या त्या 14 आमदारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिली आहेत. आमच्याकडे शिवसेनेचे एकूण 40 आमदार झाले आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहे. व्हिपचे उल्लंघन करून विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.